केवळ घोषणा करून केंद्र व राज्य सरकारने जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांचा दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याची वेळ या सरकारने शेतकऱ्यांवर आणली आहे. लोकांना पाहिजेत चारा छावण्या आणि यांनी सुरू केल्या डान्सबार लावण्या असे म्हणत अबकी बार आपटी मार म्हणत माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीका केली. सिडकोतील राजीव गांधी मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
मतांचे विभाजन टाळा आणि भाजप- सेनेला पाडा,’ असे आवाहन
वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांना उद्देशून ते म्हणाले की, ‘वंचित बहुजन आघाडीला माझी हात जोडून विनंती आहे की, भाजपला मदत होईल, असे काही करू नका. केवळ ३० टक्के मतांवर भाजपचे सरकार आलेले आहे. उर्वरित ७० टक्के मते आता एकसंध राहिली पाहिजेत. मतांचे विभाजन टाळावे यासाठीच मी स्वत: प्रकाश आंबेडकर यांच्या घरी एकदा नव्हे, तर पाच वेळा गेलो. तशी जागावाटपाचीही फार मोठी गोष्ट नाही. स्वत: प्रकाश आंबेडकर हे खासदार बनावेत, ही आम्हा सर्वांची इच्छा आहे.
२८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील
जाहीर सभेत बोलताना अशोक चव्हाण यांनी आगामी निवडणुकीचे सूतोवाच केले, ते म्हणाले कि, केंद्र व राज्य सरकारची लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. २८ फेब्रुवारी रोजी विधानसभेचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जातील, त्यादृष्टीने कामाला लागा असे आवाहन अशोक चव्हाणांनी यावेळी बोलताना केले.